१५९ कोटींच्या नगररोडचे निकृष्ट काम ; अवघ्या ४ महिन्यांत पडले खड्डे!
डागडुजी करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न ; चौकशी करून कारवाईची मागणी : डॉ. गणेश ढवळे
बीड : बीड शहरातील मुख्य शासकीय कार्यालयांना जोडणाऱ्या नगररोडच्या २४.५ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम जून २०२४ मध्ये सुरू झाले. तब्बल १५९ कोटी रुपये खर्च करून हे काम अंतिम टप्प्यात आलेले असतानाच, अजून पूर्णही न झालेले रस्ते फक्त चार महिन्यांतच खचू लागले असून अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. विशेषतः जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच रस्त्यावर खड्डे पडल्याने नागरिकांत संतापाची लाट पसरली आहे. प्रशासनाने तातडीने डागडुजी करून विषय थोपवण्याचा प्रयत्न केला असला, तरी कामाच्या निकृष्ट दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी जिल्हाधिकारी बीड आणि महाराष्ट्र राज्य महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे लेखी तक्रार दाखल केली असून, दोषींवर कठोर कारवाईसह सखोल चौकशीची मागणी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे. हे रस्ते काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) अंतर्गत साकेत कन्स्ट्रक्शन या कंपनीला दिले असून, डिसेंबर २०२४ ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली होती. मात्र वेळेत काम पूर्ण न झाल्याने आता नोव्हेंबर २०२५ ही नवीन डेडलाईन दिली आहे. कामाच्या विलंबाबाबत तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी साकेत कन्स्ट्रक्शन कंपनीवर १ कोटी रुपयांचा दंडही ठोठावला होता. तरीदेखील कामाच्या गतीत किंवा गुणवत्तेत कोणतीही सुधारणा झालेली दिसून येत नाही.
—
“गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; चौकशी करा, अन्यथा आंदोलन!” : डॉ. ढवळे
शहरातील सर्वांत महत्त्वाचा, शासकीय कार्यालये आणि नागरी वर्दळीचा रस्ता चार महिन्यांतच खचू लागल्याने संपूर्ण यंत्रणेला धक्का बसला आहे. प्रशासनाकडून केलेली डागडुजी म्हणजे निकृष्ट काम झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे, असा आरोप करत डॉ. गणेश ढवळे यांनी दोषींवर कठोर कारवाई आणि सखोल चौकशीची मागणी केली आहे. अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.