बीड जिल्हाधिकारी दालनात आ. क्षीरसागर यांची बैठक
शहर आणि ग्रामीणमधील पाणीपुरवठा, रस्ते, जमीन संपादनाच्या मुद्यांवर सविस्तर चर्चा
बीड : जिल्हाधिकारी श्री. विवेक जॉन्सन यांच्या दालनात आज बुधवार (दि.२३) रोजी आ. संदीप क्षीरसागर यांनी बीड शहर आणि ग्रामीण भागातील विकासकामांबाबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. यावेळी अमृत पाणीपुरवठा, रस्ते विकास, जमीन संपादन आणि जलजीवन मिशनच्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा झाली. यावेळी माजी आ.सय्यद सलीम उपस्थित होते.
पुढील मुद्यांवर झाली चर्चा…
-> बीड शहरातील अमृत पाणीपुरवठा योजनेची कामे कंत्राटदाराच्या ढिसाळ कारभारामुळे रखडली आहेत. यावर उपाय म्हणून मुख्य अभियंता, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, नगर परिषद आणि कंत्राटदार यांची जिल्हाधिकारी यांच्या दालनात संयुक्त बैठक आयोजित करण्याचे ठरवले.
-> छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नगर रोडवरील नवीन सिमेंट रस्ता व दुभाजक झाले आहे. हे दुभाजक होत असताना जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा न्यायालयासमोर वाहनांसाठी रस्ता क्रॉसिंग असणे आवश्यक आहे. याबाबत चर्चा केली.
-> राष्ट्रीय महामार्ग क्र. ३६१ एफ वरील खरवंडी ते नवगण राजुरी रस्त्याच्या कामासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित झाल्या; पण अनेकांना अद्यापपर्यंत मावेजा मिळालेला नाही. त्याबाबतीत मुळ दुरूस्ती, सुधारित निवाडा संबंधी वेळोवळी विभागाला मागणी प्रस्तावित केलेली आहे. याबाबतीत जमीन संपादीत होऊनही आतोनात हाल झाले आहेत. यावर आ.क्षीरसागर यांनी सविस्तर चर्चा केली.
-> बीड आणि शिरूर तालुक्यात जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेची कामे निकृष्ट आणि अपूर्ण असल्याने ग्रामस्थ त्रस्त आहेत. आ. क्षीरसागर यांनी गावनिहाय तक्रारी मांडल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासन स्तरावर तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.