स्वस्त धान्याचा काळाबाजार थांबवा; होळच्या राशन दुकानदाराविरोधात गुन्हा नोंदवून परवाना रद्द करावा
ग्रामस्थांचे पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा
बीड : तालुक्यातील होळ येथील राशन दुकानातून काळ्या बाजारात विक्रीसाठी नेत असलेले ४४ क्विंटल शासकीय धान्य धारूरमध्ये दि.१४ जुलै रोजी पोलिसांनी पकडले. याप्रकरणी संबंधित राशन दुकानदारावर गुन्हा दाखल करून परवाना कायमस्वरूपी रद्द करावा, तसेच स्वस्त धान्याचा काळाबाजार थांबवावा, अशी मागणी होळच्या ग्रामस्थांनी निवासी उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी शिवकुमार स्वामी यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते विजय केंद्रे, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे, युवा नेते धनराज लाटे, बिभीषण शिंदे, राम घुगे, व्यंकटी घुगे यांनी मंगळवारी (दि.२२) केली आहे. निवेदनात पुढे म्हटले की, १४ जुलै रोजी धारूर पोलिसांनी टेम्पो (क्र.एमएच ४४ यू २२५७) मधून ४४ क्विंटल शासकीय गहू आणि तांदूळ पकडले. वाहन चालक इब्राहिम शेखने पोलिस तपासात हे धान्य होळ येथील राशन दुकानदार अशोक तुकाराम घुगे यांच्याकडून विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली. त्यांचा भाऊ आणि होळचे उपसरपंच बाळासाहेब घुगे यांच्या नावे दुकानाचा परवाना आहे. यानंतर पुरवठा विभागाने तपासणी केली. यामध्ये दुकानात गहू शिल्लक नसणे अपेक्षित असताना १ क्विंटल ९ किलो ५९० ग्रॅम गहू आढळून आला. तांदूळ हा ५९ किलो शिल्लक असणे अपेक्षित असताना तांदूळ नसल्याचे स्पष्ट झाले. यापूर्वी असाच गैरप्रकार उघडकीस आलेला असून ही दुसरी वेळ आहे. त्यामुळे होळचे उपसरपंच व राशन दुकानदार बाळासाहेब तुकाराम घुगे, काळ्या बाजारात पुरवठा करणारा अशोक तुकाराम घुगे यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करावा. संबंधित दुकानाचा परवाना तात्काळ रद्द करावा, अशी मागणी केली आहे. कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी निवेदनात दिला आहे.
राजकीय दबावामुळे गुन्हा नोंद होईना; पुरवठा विभागाकडे दाखविले बोट!
काळ्या बाजारात जात असलेले राशन पोलिसांनी धारूरमध्ये पकडले. या प्रकरणानंतर पोलिसांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल होणे अपेक्षित होते. परंतु, पोलिसांनी पुरवठा विभागाकडे बोट दाखविले. हा टोलवाटोलवीचा सर्व प्रकार राजकीय दबावातून झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. दरम्यान, धान्याची तफावत आढळल्याने जिल्हा पुरवठा विभागाकडून केजच्या तहसीलदारामार्फत स्वस्त धान्य दुकानदाराला नोटीस बजावली जाणार आहे. तर, जप्त केलेल्या धान्याचे नमुने तपासणीसाठी धारूरच्या पुरवठा विभागाकडून प्रयोगशाळेकडे पाठविले जात आहेत.