न रडता लढणं हा गुण दिव्यांगांकडून घेण्यासारखा : आ.संदीप क्षीरसागर
बीड येथे दिव्यांग व जेष्ठ नागरिक पूर्वतपासणी शिबीर
बीड : शारिरीक व्यंगामुळे पावलोपावली संघर्ष असताना न रडता कायमस्वरूपी लढणं हा प्रेरणादायी गुण दिव्यांगांकडून घेऊन आयुष्यात अवलंबण्यासारखा आहे. असे प्रतिपादन आ.संदीप क्षीरसागर यांनी केले. बीड येथील दिव्यांग व जेष्ठ नागरिक पूर्वनोंदणी शिबीरात अध्यक्षीय समारोपात ते बोलत होते. यासोबतच बीड विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील बीड शहर, बीड ग्रामीण आणि शिरूर कासार तालुक्यातील उर्वरित दिव्यांग बांधव व जेष्ठ नागरिकांनी पूर्वनोंदणी करून घेण्याचे आवाहनही आ.क्षीरसागर यांनी केले आहे. जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग व अलिम्को संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने, खा.बजरंग बप्पा सोनवणे यांच्या संकल्पनेतून दिव्यांग व्यक्तींना व जेष्ठ नागरिकांना मोफत कृत्रिम साहित्य आणि साधने वाटपाच्या अनुषंगाने पूर्व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.संदीप क्षीरसागर होते. यावेळी बीड शहर आणि ग्रामीण भागातील दिव्यांग आणि जेष्ठ नागरिकांना कृत्रिम साहित्य आणि साधने मोफत वाटप करण्याच्या अनुषंगाने पूर्वनोंदणी करण्यात आली. यावेळी बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जतीन रहमान, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.जाधव, जिल्हा समाजकल्याण अधिकारी श्रावस्ती मेश्राम, माजी आ.सय्यद सलीम, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, गटविकास अधिकारी श्रीमती कांबळे आदींसह दिव्यांंग बांधव आणि जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.