सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गौतम वाघमारे सेवानिवृत्त; लिंबागणेशकरांकडून भव्य सत्कार
३३ वर्षांची निष्ठावान सेवा • ४३ पदकांनी सन्मानित • सर्वांचे लाडके ‘वाघमारे भाऊ’
———-
लिंबागणेश : बीड पोलीस खात्यात ३३ वर्षे कर्तव्यनिष्ठ, शिस्तबद्ध आणि समाजाभिमुख सेवा बजावणारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गौतम भानुदास वाघमारे दिनांक ३० जून २०२५ रोजी सेवानिवृत्त झाले. लिंबागणेश परिसरात तसेच पंचक्रोशीत ‘वाघमारे भाऊ’ या नावाने परिचित असलेल्या या व्यक्तिमत्त्वाने आपल्या कार्यकाळात अविस्मरणीय ठसा उमटवला. त्यांनी बीड शहर पोलीस ठाणे, बीड ग्रामीण, नेकनूर, गेवराई, वडवणी तसेच लिंबागणेश पोलीस चौकी येथे प्रामाणिक सेवा बजावली. त्यांच्या कर्तव्यनिष्ठ सेवेचा गौरव म्हणून ४३ पदकांनी त्यांना सन्मानित करण्यात आले, ही बाब त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष आहे. वाघमारे भाऊंच्या सेवेचे वैशिष्ट्य म्हणजे — मानवी मूल्यांची जपणूक, संघर्षमय कुटुंबांना आधार, तसेच निर्दोष नागरिकांना न्याय मिळवून देणे. त्यांच्या कार्यकाळात एकाही निर्दोष व्यक्तीवर खोटा गुन्हा दाखल झाला नाही. या बाबत बोलताना डॉ. गणेश ढवळे म्हणाले, “वाघमारे भाऊ म्हणजे सत्याला सत्य आणि खोट्याला खोटं ठामपणे सांगणारे अधिकारी. त्यांनी कधीही कोणाची पिळवणूक केली नाही.” त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही ते आदर्श ठरले. त्यांच्या तीन मुलांपैकी एक वकील, एक डॉक्टर आणि एक प्राध्यापक झालेला आहे. ही त्यांच्या संस्कारांची आणि शिक्षणातील मूल्यांची फलश्रुतीच आहे. लिंबागणेश येथे पोलीस मित्र ग्रुपचे तुळशीराम पवार, योगेश शिंदे आणि पत्रकार हरिओम क्षीरसागर यांच्या पुढाकाराने भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेवा सोसायटी चेअरमन रविंद्र निर्मळ, सुत्रसंचलन हरिओम क्षीरसागर तर आभारप्रदर्शन डॉ.गणेश ढवळे यांनी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच बालासाहेब जाधव तर प्रमुख पाहुणे म्हणून नेकनुर पोलिस स्टेशनचे पो.उपनिरीक्षक आप्पासाहेब रोकडे , सहाय्यक फौजदार बाबासाहेब राख उपस्थित होते. या कार्यक्रमात राजेभाऊ गिरे,,बाळकृष्ण थोरात, विक्रांत वाणी, सुरेश निर्मळ,दादा गायकवाड, औदुंबर नाईकवाडे,सरपंच बिभिषण मुळीक (पोखरी घाट), विश्वंभर गिरी (महाजनवाडी), मुळुकवाडीचे कृष्णा पितळे, विष्णुपंत घरत महाराज तसेच इतर ग्रामपंचायत सदस्य ,पंचक्रोशीतील अनेक मान्यवर, नागरिक, हितचिंतक उपस्थित होते. भावपूर्ण वातावरणात सत्कार समारंभ पार पडला.