बीड : खासगी सावकरांची नावे चिट्ठीत लिहून एका तरूण कापड व्यावसायिकाने घरासमोर गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना काल रविवारी सकाळी काळा हनुमान ठाणा पेठ बीड भागात उघडकीस आली होती. सदरील व्यापाऱ्याने लिहीलेल्या सुसाईड नोटमध्ये भाजपा भटके विमुक्त सेलचा जिल्हाध्यक्ष डॉ. लक्ष्मण जाधव याच्यासह सातजणांची नावे आहेत. या प्रकरणात पेठबीड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच डॉ. लक्ष्मण जाधव याला अटक करण्यात आली आहे. राम दिलीप फटाले (४२, रा. काळा हनुमान ठाणा, पेठबीड) असे आत्महत्या केलल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. राम याच्या आत्महत्या प्रकरणात त्याचे वडील दिलीप फटाले यांनी पेठवीड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यामध्ये राम याने लिहीलेल्या सुसाईड नोटमध्ये लिहीले आहे की, डॉ. लक्ष्मण जाधव व त्याची पत्नी वर्षा जाधव यांनी मानसिक छळ केला. मी त्यांच्याकडून व्याजाने घेतलेले पैसे परत केले तरी मला लक्ष्मण जाधव त्रास देत असल्याबाबत लिहीले आहे. त्यानंतर तो आमच्या घरी येवून दमदाटी करुन पंचवीस हजार रुपये महिना प्रमाणे पैसे घेवून जात होता. दि.४ जुलै रोजी संध्याकाळी ६ वाजता डॉ. लक्ष्मण जाधव, त्याची पत्नी वर्षा जाधव हे घरी आले होते. त्यांनी मुलगा राम यास पैसे परत करण्याबाबत विचारणा करत धमकी दिली होती. याबरोबरच कल्याण फायनान्सचा दिलीप उघडे, मेडीकलवाला काशीद के. के. व त्याची सासु, वारे बाई, मस्के, मधु चांदणे हे देखील घरी येवून मुलाला पैशाच्या कारणावरुन मानसिक त्रास देत होते असे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणात पेठबीड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास एपीआय नित्यानंद उबाळे हे करत आहेत.