बीडमध्ये ‘सीट्रिपलआयटी’ला जागेसह निधी देण्याचा निर्णय
अजितदादांमुळे बीड जिल्ह्यात औद्योगिक वातावरण विकसित होईल : डॉ.योगेश क्षीरसागर
बीड : उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या पुढाकारामुळे या महत्त्वाकांक्षी ‘सीट्रिपलआयटी’ (सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन, इन्क्युबेशन अॅण्ड ट्रेनिंग) या प्रकल्पाच्या उभारणीस गती मिळाली आहे. प्रकल्पासाठी ४ हजार चौ.मी. जागा मंजूर केली असून निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय झाला आहे. अजितदादांमुळे जिल्ह्यात औद्योगिक वातावरण विकसित होईल, असा विश्वास व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांनी अजितदादा पवार यांचे आभार मानले आहेत. बीडमध्ये सीट्रिपलआयटी प्रकल्पासाठी ४,००० चौ. मी. जागा मंजूर करण्यात आली आहे. एमआयडीसीकडून जागा देण्यासाठी आणि प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा १९१ कोटींचा प्रकल्प असून, टाटा टेक्नॉलॉजीकडून पुढाकार घेण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे दरवर्षी सुमारे ७,००० युवकांना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार आहे. जिल्हा प्रशासन या प्रकल्पासाठी ३३ कोटींचा खर्च उचलणार असून, प्रशिक्षणाचा खर्च पहिल्या तीन वर्षांसाठी टाटा टेक्नॉलॉजीकडून केला जाणार आहे. या प्रकल्पामुळे उद्योग आणि रोजगाराच्या संधीमध्ये बीड जिल्ह्यात नवा अध्याय सुरू होणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील तरुणांना रोजगार, कौशल्यविकास आणि नवीन तंत्रज्ञान प्रशिक्षणाची संधी मिळणार असून जिल्ह्याच्या औद्योगिक प्रगतीला बळ मिळणार आहे, असा विश्वास डॉ.योगेश क्षीरसागर यांनी व्यक्त करत अजितदादा पवार यांचे आभार मानले आहेत. तसेच, जिल्ह्यातील युवकांना कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रात स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळणार असून औद्योगिक वातावरण विकसित होईल, असेही म्हटले आहे.