आणखी पालकांच्या तक्रारी असल्यास त्यांना शासनाची संपूर्ण सुरक्षा
बीड : शहरातील उमाकिरण शैक्षणिक संकुलात कोचिंग क्लास मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थीनीचा लैंगिक छळ करणा-या आरोपींविरुद्ध कठोर आणि कडक कार्यवाही करा अशा सूचना पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी एसपींना केल्या आहेत. या घटनेविषयी ना. पंकजाताई मुंडे यांनी जिल्हयाचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्याशी नुकतीच घटनेची माहिती घेवून याविषयी सूचना केल्या. उमाकिरण शैक्षणिक संकुलातील शिक्षक प्रशांत खटावकर आणि विजय पवार या दोघांनी एका सतरा वर्षीय विद्यार्थिनीचे गेल्या एक वर्षापासून लैंगिक शोषण केले, याविरूध्द सदर विद्यार्थिनीने शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल केल्यानंतर ना. पंकजाताई मुंडे यांनी लगेच पोलिस अधीक्षकांना फोन करून आरोपींना तात्काळ अटक करण्याची सूचना केली होती. मुळातच ही घटना अतिशय संतापजनक आणि जिल्ह्याला काळीमा फासणारी आहे. शिक्षकांचे हे कृत्य गंभीर स्वरूपाचे आहे, त्यांना ताब्यात घेतले असले तरी ते सुटले जावू नयेत, यासाठी त्यांचेवर तात्काळ कडक कार्यवाही करा अशी सूचना ना. पंकजाताई मुंडेंनी केली. यासंदर्भात आणखी पालकांच्या तक्रारी असल्यास त्यांना शासनाची संपूर्ण सुरक्षा दिली जाईल, त्यांनी यासाठी पुढे यावे असे आवाहनही ना. पंकजाताईंनी केले आहे.