सात वर्षानंतर आईवडिलांची झाली मुलाशी भेट..
AHTU आणि LCB टीमची संयुक्त कार्यवाही…
बीड : पोस्टे पिंपळेनर गुरन १४३/२०२३ कलम ३७३ भादवी मधील अल्पवयीन मुलगा राजु काकासाहेब माळी वय १६ वर्ष (२०१७ चे वय) हा घरातून निघून गेला होता. सदर गुन्ह्याबाबत माहीती अशी की राजु हा दहावीचे शिक्षण घेण्यासाठी संगमेश्वर विद्यालय नालवंडी येथे शिकायला होता. त्याची राहण्याची सोय नसल्याने तो शिक्षक ज्ञानेश्वर राऊत यांच्या घरी राहत होता. आईवडीलांची परिस्थिती एकदम हलाकीची होती. ते ऊसतोडी कामगार असल्याने कर्नाटक राज्यात कामासाठी गेले होते. डिसेंबर २०१७ मधे राजु हा शाळा सुटल्यावर कोणाला काही एक न सांगता निघून गेला. याबाबत त्याच्या आई वडिलांना माहिती मिळाली तेव्हा त्यांना कर्नाटक वरून येण्यास आठ दिवस लागले. राजू चे आई वडिलांना वाटले की राजू काही दिवसात परत येईल, व ते दोघेही अशिक्षित असल्याने त्यांनी गुन्हा दाखल केला नाही. असे करत पाच ते सहा वर्ष निघून गेले. पण राजु परत आलाच नाही, मग २०२३ मधे त्याच्या आईने पोस्टे पिंपळनेर ला गुन्हा दाखल केला. सदर गुन्हा जानेवारी २०२५ मधे AHTU ला वर्ग झाला. पीएसआय पल्लवी जाधव यांनी AHTU चा चार्ज घेतल्यावर सदर गुन्ह्याच्या फाइल चे बारकाईने अवलोकन केले. आणि तपासास सुरवात केली. राजूच्या आईवडिलांची भेट घेतली त्यांचे अश्रु आणि दुःख खूप वेदनादायक होते. त्यानंतर राजूच्या शाळेत जावून त्याचे शिक्षकांची ही भेट घेतली व त्याच्या बाबत माहिती घेतली. त्यानंतर मागचे पाच वर्ष गुन्हा का दाखल झाला नाही म्हणून शिक्षक ज्ञानेश्वर राऊत यांची भेट घेतली. कारण सदर शिक्षकाच्या घरी राजू राहत होता, एखादा मुलगा आपल्या ताब्यातून निघून गेल्यावर त्याने गुन्हा दाखल का केला नाही? त्यांनीच राजु चे काही बरेवाईट तर केले नसेल ना असा संशय पीएसआय पल्लवी जाधव यांना आला. मग पीएसआय पल्लवी जाधव यांनी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत सर यांची भेट घेवून गुन्ह्याबाबत सर्व माहिती सांगितली व सदर शिक्षकावर संशय असले बाबत ही सांगितले. सरांनी सांगितले की तुम्ही पुढील तपासात LCB ची मदत घ्या. व तसा आदेश त्यांनी पोनी शिवाजी बंटेवाड एलसीबी यांना दिला. पोनि बंटेवाड सर यांनी पीएसआय पल्लवी जाधव यांच्या मदतीसाठी पीएसआय श्रीराम खटावकर यांना आदेश दिला. त्यानंतर दोघांनी मिळून तपास सुरू केला. सदर शिक्षकाकडून काही एक माहिती मिळाली नाही. त्यानंतर पीएसआय खटावकर यांनी टेक्नीकल टीम च्या मदतीने राजू ची माहिती काढली. सदर माहितीवरून राजूचे लोकेशन पुणे येथे असल्याचे समजले. व त्याला शोधून विश्वासात घेवून पुणे वरून बीड ला आणले. आज रोजी सकाळी पीएसआय खटावकर यांनी राजू ला पुढील तपासकामी पीएसआय पल्लवी जाधव यांच्या ताब्यात दिले. त्यानंतर त्यास पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या समोर हजर केले. त्यावेळी तेथे राजूचे आई वडील ही हजर होते. त्यांच्यासाठी ही विशेष भेट सरांनी घडवून आणली. सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, पोनि शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक पल्लवी जाधव , पोलीस उप निरीक्षक श्रीराम खटावकर , पोलीस हवालदार असिफ शेख, आनंद म्हस्के, हेमा वाघमारे , उषा चौरे, प्रदीप येवले, अशोक शिंदे, पोना अर्जुन यादव, पोलीस शिपाई प्रदीप वीर, योगेश निर्धार सर्व नेमणूक AHTU व LCB टीम यांनी केली.