परळीला ३ नवीन नायब तहसीलदारांची नियुक्ती
माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश
महसूल व निवडणूक कामकाजाला गती येणार
परळी : परळी तालुक्याला तीन नवे नायब तहसीलदार मिळाले असून, महसूल व निवडणूक विभागाच्या कामकाजात आता गती येणार आहे. माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले असून, राज्य शासनाने अधिकृत आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार परळी तहसील कार्यालयात महसूल विभागासाठी नायब तहसीलदार पंडित सुरवसे, निवडणूक विभागासाठी अशोक भोजने यांची तर परळी उपविभागीय अधिकारी कार्यालयात महेश वाकडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बऱ्याच काळापासून परळी तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार पदे रिक्त होती. परिणामी, नागरिकांच्या महसूल व निवडणूक संबंधित कामांमध्ये अडथळे निर्माण होत होते. ही रिक्त पदे भरल्यामुळे आता कामकाज अधिक कार्यक्षमतेने पार पाडले जाणार आहे. या नियुक्त्यांमुळे तालुक्यातील प्रशासकीय कामांना चालना मिळणार असून, या निर्णयाबद्दल माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानले आहेत.