बीड : स्व.महादेव मुंडे यांचे कुटुंबीय न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी बीड येथे संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असलेल्या बैठकीस मी येत आहे, तुम्हीही या असे आवाहन आमदार संदीप क्षीरसागर यांनी केले आहे. परळी येथील स्व.महादेव मुंडे यांची हत्या होऊन 20 महिने उलटले आहेत. 18 महिन्यांपासून आरोपी कोण याचाच पोलीसांना शोध लागलेला नाही. स्व.महादेव मुंडे यांची, स्व.संतोष देशमुख यांच्याप्रमाणेच निघृण हत्या करण्यात आली होती. अतिशय गंभीर प्रकरण असतानाही पोलीस आणि सरकार मूग गिळून गप्प आहेत. न्यायासाठी स्व.महादेव मु़ंडे यांच्या पत्नी सातत्याने आंदोलन करत आहेत. काही दिवसांपूर्वी तर अक्षरशः त्यांनी बीड पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयासमोर आंदोलन करत विष प्राशन केले होते. जर न्यायाच्या मागणीसाठी आपल्या एका भगानिला विष प्राशन करण्याची वेळ येत असेल तर ही लाजिरवाणी बाब आहे. त्यामुळे स्व.महादेव मुंडे यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नसून आता स्व.संतोष देशमुख हत्याप्रकरणात न्यायासाठी ज्याप्रकारे आंदोलन केले होते त्याचप्रकारे आंदोलन उभे करावे लागणार आहे. या अनुषंगाने बीड शहरात 1 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता रामकृष्ण लॉन्स येथे संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वधर्मीय, सर्वजातीय, सर्वपक्षीय बैठक होणार आहे. स्व.महादेव मुंडे व त्यांच्या कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी या बैठकीस सर्व समाजातील बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आ.संदीप क्षीरसागर यांच्या वतीने करण्यात आले आहे.