24.5 C
New York
Tuesday, August 5, 2025

Buy now

spot_img

बालरंगभूमी परिषदेचा शिवरायांच्या गौरवशाली इतिहासावर आधारित ‘इतिहास महाराष्ट्राचा’ उपक्रम

बालरंगभूमी परिषदेचा शिवरायांच्या गौरवशाली इतिहासावर आधारित ‘इतिहास महाराष्ट्राचा’ उपक्रम

बीडमध्ये १२ ऑगस्टला प्राथमिक फेरी; अंतिम फेरी मुंबईत २३ व २४ ऑगस्टला

बीड : छत्रपती शिवाजी महाराजांचा तेजस्वी इतिहास लहान मुलांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने बालरंगभूमी परिषदेने ‘इतिहास महाराष्ट्राचा’ हा विशेष उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाअंतर्गत शिवजन्मोत्सव ते शिवराज्याभिषेक या कालखंडातील महत्त्वाच्या घटनांचे सादरीकरण नृत्य, नाट्य, संगीत, चित्रकला, शिल्पकला आणि इतर कला प्रकारांद्वारे करण्यात येणार आहे. या उपक्रमाची प्राथमिक फेरी बीडमध्ये दि.१२ ऑगस्ट २०२५ रोजी होणार असून अंतिम फेरी २३ व २४ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबईत पार पडणार आहे. ही माहिती बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा नीलम शिर्के-सामंत, बीड जिल्हाध्यक्षा डॉ. दीपा क्षीरसागर आणि प्रमुख कार्यवाह योगेश शुक्ल यांनी दिली.या स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्रातील सर्व शाखा स्तरावर करण्यात आले आहे. स्पर्धा एकल आणि समूह अशा दोन गटांमध्ये होणार आहे. एकल गटामध्ये वयोगट १ व २ मधून प्रत्येकी प्रथम व द्वितीय क्रमांकाचे स्पर्धक, तसेच समूह गटातून दोन संघ अंतिम फेरीसाठी निवडले जाणार आहेत. एकल गट १: स्पर्धकांनी स्वतः छत्रपती शिवाजी महाराज किंवा त्याकाळातील अन्य व्यक्तिमत्त्वांचे सादरीकरण ५ मिनिटांत करावे. एकल गट २ व समूह गट: शिवजन्मोत्सव ते राज्याभिषेक दरम्यानच्या घटनांचे १० मिनिटांपर्यंत सादरीकरण अपेक्षित असून, यामध्ये ४ ते ८ बालकलावंतांचा सहभाग असावा. विविध कला प्रकारांचा समन्वय असावा. प्रत्येक सादरीकरणासाठी वाद्यवृंद, नेपथ्य, रंगभूषा आणि वेशभूषेची जबाबदारी संबंधित स्पर्धकांची असेल. आयोजकांकडून फक्त ध्वनी व प्रकाशयोजनेची सुविधा दिली जाईल. स्पर्धेचे निकाल अंतिम व बंधनकारक असतील. प्राथमिक व अंतिम फेरीतील सर्व सहभागी आणि विजेत्यांना प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी नाव नोंदणीची अंतिम तारीख ८ ऑगस्ट असून, अधिकाधिक शालेय विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन बालरंगभूमी परिषदेचे बीड जिल्हा पदाधिकारी डॉ. संजय पाटील देवळाणकर, स्नेहल पाठक, विलास सोनवणे, अनुराधा चिंचोलकर, मिलिंद शिवनीकर, दीपक जमदाडे, दुष्यंता रामटेके, नामदेव साळुंखे, सुरेश साळुंखे, विजय राख, राहुल सोनवणे, असलम शेख, अमित गाढे, बालासाहेब कांबळे, रोहित पुराणिक, दीपक गिरी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी विजय राख: 9833345809, अमित गाढे: 8888966792, दीपक गिरी: 8177924756, रोहित पुराणिक: 9325212199, सिद्धार्थ अग्रवाल: 9765085331, सुमित गायकवाड: 7028027852 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या