मुंबई : मुंबईला हादरवून टाकणाऱ्या ११ जुलै २००६ च्या साखळी बॉम्बस्फोटातील १२ दोषींची आज मुंबईउच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. दोषींपैकी ५ जणांना फाशीची शिक्षाची तर ७ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या पाच जणांनी फाशीच्या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. उच्च न्यायालयाने त्यांचा अपील मान्य केला. फाशीची शिक्षा रद्द करू नये अशी मागणी राज्य सरकारकडून करण्यात आली होती. पण न्यायालायने दिलेल्या निर्णयामुळे राज्य सरकारला दणका बसला आहे. १२ दोषींपैकी एकाचा आधीच मृत्यू झाला आहे. तर ११ जणांचा आता तुरुंगाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. १९ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर दोषींची निर्दोष मुक्तता झाली आहे. गेली १९ वर्ष यातील दोषी एकही दिवस तुरुंगाबाहेर आले नव्हते. मुंबईत ११ जुलै २००६ रोजी संध्याकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास लोकलमध्ये एकूण ७ ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. माटुंगा, माहीम, बांद्रा, जोगेश्वरी, बोरीवली, कांदिवली, मीरारोड या रेल्वे स्थानकांदरम्यान स्फोट झाले होते. यात २०९ हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. कमाल अन्सारी, मोहम्मद फैसल, अतौर रहमान शेख, एहतेशाम कुतुबुद्दीन सिद्दीकी, नवीद हुसेन खान आणि आसिफ खान या सर्वांना बॉम्ब ठेवल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले होते. या पाचही जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. यातील कमाल अन्सारीचा कोरोनाची लागण झाल्यामुळे नागपूर कारागृहात मृत्यू झाला होता. आता उर्वरित चार जण निर्दोष ठरवण्यात आले आहेत. जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्या सात आरोपींमध्ये तनवीर अहमद अन्सारी, मोहम्मद माजिद शफी, शेख मोहम्मद अली आलम, मोहम्मद साजिद मार्गुब अन्सारी, मुझ्झम्मिल अतौर रहमान शेख, सुहेल मेहमूद शेख आणि जमीर अहमद लतीफुर रहमान शेख यांचा समावेश आहे. या सातही जणांना न्यायालयाने निर्दोष ठरवले आहे.
तब्बल 19 वर्षानंतर निकालाची सुनावणी…
दरम्यान, या प्रकरणात 12 पैकी 11 आरोपींनी येरवडा, नाशिक, अमरावती आणि नागपूर कारागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजेरी लावली. त्यानंतर त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. तब्बल 19 वर्षानंतर या निकालाची सुनावणी झाली आहे. यातील पाच जणांना फाशीची शिक्षा झाली होती. तर मुंबई उच्च न्यायालयाने 11 आरोपींची निर्दोष म्हणून सुटका केली आहे.