घरकुलसाठी पात्र लाभार्थींनी सेल्फ सर्व्हे करून घ्यावा : आ.संदीप क्षीरसागर
ग्रामीण भागातील घरकुलच्या सेल्फ सर्व्हेला ३१ जुलैपर्यंत अंतिम मुदतवाढ
बीड : पात्र असलेल्या नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत नव्याने घरकूल मिळणार असून त्याकरिता ऑनलाईन सेल्फ सर्व्हे करण्यासाठी ३१ जुलै ही अंतिम मुदतवाढ मिळाली आहे. ३१ जुलै पर्यंत नागरिकांना मोबाईल ॲपद्वारे सेल्फ सर्व्हे करता येणार आहे. त्यामुळे बीड मतदारसंघ क्षेत्रातील बीड व शिरूर कासार तालुक्यातील ज्या नागरिकांचे सेल्फ सर्व्हे करणे बाकी आहे अशा निकषपात्र नागरिकांनी आपल्या मोबाइलद्वारे किंवा आपल्या ग्रामसेवकामार्फत ३१ जुलै पर्यंत सेल्फ सर्व्हे करून घ्या असे आवाहन आ.संदीप क्षीरसागर यांनी केले आहे. प्रधानमंत्री आवास योजनेत समाविष्ट होण्यासाठी सध्या सद्या सेल्फ सर्व्हे करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये आपली नोंदणी करण्यासाठी ग्रामपंचायत अधिकारी/ ग्रामसेवक यांचे मार्फत किंवा आपण स्वतः सेल्फ सर्व्हे करून आपली नोंदणी करू शकता. निकषांचे पालन करून कच्चे घर असणाऱ्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेसाठी सेल्फ सर्व्हे करून आपली नोंदणी करून घ्यावी, नोंदणी करण्यासाठी अंतिम मुदतवाढ मिळालेली आहे. ३१ जुलै २०२५ ही शेवटची तारीख असून त्या अगोदरच बीड मतदारसंघातील पात्र नागरिकांनी आपले सर्वेक्षण करुन घ्यावे असे आवाहन आ.संदीप क्षीरसागर यांच्याकडून करण्यात आले आहे.
अशाप्रकारे करावा सेल्फ सर्व्हे
सेल्फ सर्व्हे करण्यासाठी आवास प्लस- २०२४ हे शासनाचे अधिकृत प्ले-स्टोअरवरून आपल्या मोबाईलमध्ये इंस्टॉल करावे, नंतर आधार फेस आरडी हे ॲप देखील इंस्टॉल करुन घ्यावे, त्यानंतर आपले रजिस्ट्रेशन करून ॲपवर विचारलेली माहिती भरावी, शेवटी आपल्या कच्या घराचा फोटो व आपण बांधणार असलेल्या घराची जागा यांचे फोटो अपलोड करावा, आधार व जॉब कार्डचे व्हेरिफिकेशन करून केलेला सर्व्हे अपलोड करावा. जर स्मार्टफोन उपलब्ध नसेल किंवा तांत्रिक बाबी हाताळण्यास अडचण येत असल्यास आपल्या गावचे ग्रामसेवक यांच्यामार्फतही सर्व्हे करून घरकुलसाठी अर्ज करता येतो.