लिंबागणेश येथे विद्युत मोटार पंप चोरांचा सुळसुळाट
नेकनुर पोलिस प्रशासनाचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष : डॉ.गणेश ढवळे
—
लिंबागणेश : बीड तालुक्यातील लिंबागणेश परीसरात काही महिन्यांपासून छोट्या मोठ्या भुरट्या चो-या, विद्युत मोटारी चोरणे, रोहित्राचे वायर चोरी अशा घटना घडत असुन गेल्या ६ महिन्यात २२ विद्युत मोटार चोरीच्या घटना घडुन संबंधित प्रकरणी पोलिस प्रशासनाला तक्रारी करूनही पोलिस प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असुन शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या पंधरा दिवसात दोन वेळा विद्युत मोटार वायरच्या चोरीची घटना घडलेल्या मुळेवस्ती वरील शेतकरी रामदास मुळे यांनी विहीरीत पाणी असुन पिकांना पाणी देता येईना झाले तर जनावरांबरोबरच माणसांच्या पिण्याच्या पाण्याची अडचण असल्याची संतप्त प्रतिक्रिया दिली. याचवेळी लिंबागणेश येथील सामाजिक कार्यकर्ते विक्रांत वाणी यांनी ३ महिन्यांपूर्वी विद्युत मोटार,पेटी आणि वायर चोरीची घटना घडल्याची लेखी तक्रार नेकनुर पोलिस स्टेशनचे सपोनी चंद्रकांत गोसावी यांना दिल्यानंतर त्यांनी फिर्याद घेतली नसुन वारंवार पाठपुरावा करूनही तपास झालाच नसल्याने नेकनुर पोलिस स्टेशन जाणिवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला आहे. पावसाने ओढ धरल्याने दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर असतानाच शेतकरी उपयोगी साहित्य चोरीच्या वाढत्या घटनांमुळे शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असुन चोरट्यांवर लगाम लावण्यासाठी पोलिस प्रशासनाने कठोर उपाययोजना करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांनी केली आहे. लिंबागणेश येथील मुळे वस्तीवरील रोहित्रांवर जवळपास २० शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन असुन गेल्या १५ दिवसांत मोटार वायर चोरीच्या घटनाची हि दुसरी घटना असुन माझ्या विहिरीवरील १५०० फुट वायर, विद्युत पेटी असा एकुण ३० हजार रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे. त्यामुळे याचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी रामदास मुळे, डिगांबर मुळे,सूदाम मुळे, सुभाष मुळे,रामराजे मुळे, अशोक मुळे, नवनाथ मुळे ,प्रकाश मुळे यांनी केली आहे.
सपोनी गोसावी यांनी फिर्याद सुद्धा घेतली नाही : विक्रांत वाणी
—
लिंबागणेश परीसरात गेल्या ६ महिन्यात २२ पेक्षा जास्त विद्युत मोटार पंप आणि वायर चोरीच्या घटना घडल्या आहेत. ३ महिन्यांपूर्वी माझ्या शेतातील विद्युत मोटार पंप, पेटी आणि वायर मिळुन २० हजारांचा ऐवज लंपास झाला होता. नेकनुर येथे सपोनी चंद्रकांत गोसावी यांना मोटार चोरणारांच्या टोळीची नावे सांगुनही त्यांनी माझी फिर्याद घेतली नाही. वारंवार पाठपुरावा करूनही तपासाच्या नावाखाली टोलवाटोलवी सुरू असुन नेकनुर पोलिस स्टेशनचे अधिकारी जाणिवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत त्यामुळे चोरीच्या घटनात वाढ होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते विक्रांत वाणी यांनी केला आहे. लिंबागणेश परीसरात दुबार पेरणीचे संकट उद्भवले असतानाच शेतातील पाणबुडी, विद्युत मोटारी, वायर आदी शेतकरी उपयोगी साहित्य चोरीच्या घटनांमुळे शेतकऱ्यांसमोर नवं संकट उभे राहिले. यामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण असुन पोलिस प्रशासनाने चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी डॉ.गणेश ढवळे यांनी केली आहे.