आ.संदीप क्षीरसागरांच्या पुढाकारातून मिळणार निराधारांना आधार
संजय गांधी, श्रावणबाळ योजनेचे नवीन ३७८ प्रस्ताव मंजूर
बीड : बीड ग्रामीण व शहरी भागातील ३७८ निराधार, दुर्बल लोकांचे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा निवृत्तीवेतन योजनेंतर्गत प्रस्ताव मंजूर झाले असून आ.संदीप क्षीरसागर यांच्या पुढाकारातून आणि प्रयत्नातून निराधारांना आधार मिळणार आहे.
पात्र वयोवृद्ध निराधार, अपंग, विधवा, परिक्तत्या, दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या समाजातील दुर्बल घटकांना शासनाकडून संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ सेवा निवृत्तीवेतन योजनेंतर्गत आर्थिक सहाय्य केले जाते. बीड विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील नागरिकांच्या, या योजनांच्या प्रस्तावांवर तातडीने कार्यवाही करून निकषपात्र नागरिकांना लाभ देण्याचे निर्देश आ.संदीप क्षीरसागर यांनी प्रशासनाला दिले होते. त्यावर प्रशासनाकडून आलेल्या प्रस्तावावर कार्यवाही करत २९ मे २०२५ च्या बैठकीत संजय गांधी निराधार योजनेंतर्गत शहरी भागातील ४५ तर ग्रामीण भागातील ६२ नागरिकांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. यासोबतच श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन योजनेंतर्गत शहरी भागातील ४६ तर ग्रामीण भागातील २२५ नागरिकांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. दरम्यान काही अर्ज त्रुटीत असून त्याच्या पुर्ततेसाठी तहसील कार्यालयात संपर्क करण्याचे आवाहनही आ.क्षीरसागर यांनी केले आहे.