गेवराई : जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळाचे कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय शिवाजीनगर गढी येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने वर्दडी जि.बुलढाणा येथील सोमपुरी बाबा यांची बुलढाणा ते पंढरपूर येथे निघालेल्या दिंडीतील वारकऱ्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. महाविद्यालय परिसरातील जय भवानी मंदिर, शिवाजीनगर गढी येथे दिंडीतील वारकऱ्यांसाठी महाप्रसादाचे आयोजन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले. यावेळी दिंडीतील वारकऱ्यांना जीवनावश्यक वस्तू व कपड्यांचे वाटप करण्यात आले. दिंडीतील वारकऱ्यांच्या आगमनाने मंदिर परिसर टाळ, मृदंग व हरिनामाने निनादला. यावेळी महिला वारकऱ्यांनी विविध पारंपारिक खेळांचा मनसोक्त आनंद घेतला. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफे. डॉ. सदाशिव सरकटे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. जयराम ढवळे, प्रोफे. डॉ. राणी जाधव व प्रा. श्रीकिसन लोणकर यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेऊन यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. यावेळी महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी, परिसरातील नागरिक व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक बहुसंख्येने उपस्थित होते.