उमाकिरण प्रकरणात लवकरच ‘दूध का दूध, पाणी का पाणी’
आरोपी माझ्या जवळचे असले तरीही मी त्यांची पाठराखण केली नाही आणि करणार नाही
विरोधकांच्या आरोपांना आ.संदीप क्षीरसागरांकडून प्रत्युत्तर
बीड : बीडमधील उमाकिरण शैक्षणिक संकुलात अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने राज्यभर खळबळ उडाली आहे. या प्रकरणाती आरोपी प्रा.विजय पवार हे बीड मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या जवळचे असून त्यांनी आरोपीना मदत केली असल्याचे आरोप अनेकांकडून करण्यात आले. परंतु आरोपी माझ्या जवळचे होते आहेत, हे मी मान्य करतो परंतु मी त्यांची अजिबात पाठराखण केलेली नाही आणि करणारही नाही. वेळ पडल्यास पीडितेला न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरू. असे सांगत आ.क्षीरसागरानी विरोधकांच्या बिनबुडाच्या आरोपांना प्रत्युत्तर देत सर्व आरोप खोडून काढले आहेत. दि.२७ जून २०२५ रोजी बीड शहरातील नामांकित उमाकिरण शैक्षणिक संकुलात एका अल्पवयीन मुलीवर प्राध्यापकांकडून लैंगिक अत्याचार झाल्याप्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या प्रकरणातील आरोपी प्रा.विजय पवार हे आ.संदीप क्षीरसागरांच्या जवळचे आहेत. आरोपींवर आ.क्षीरसागरांचा राजकीय वरदहस्त आहे. आरोपीना आ.क्षीरसागरानी मदत केली. अशा अनेक आरोपपूर्ण बातम्यांनी सनसनी माजवली होती. मुंबई येथे सुरु असलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनातही हा मुद्दा चर्चेचा ठरला. अनेक आरोप झाले. त्यानंतर आता आ.संदीप क्षीरसागर मैदानात उतरले असून त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत झालेल्या सर्व आरोपांना प्रत्युत्तर दिले.
काय म्हणाले आ.क्षीरसागर?
आरोपी हे माझ्या जवळचे आहेत हे मी अजिबात नाकारत नाही. परंतु मी त्यांच्या या प्रकरणात अजिबात पाठराखण केलेली नाही, आणि करणारही नाही. पीडित भगिनीला न्याय देण्यासाठी वेळ पडली तर रस्त्यावर उतरू. पोलीस योग्य दिशेने तपस करत आहेत. आरोपीना तातडीने अटक करण्यात आली आहे. मी सातत्याने पोलीस प्रशासनाशी चर्चा करून माहिती घेत आहे. विरोधकांनी, माझे सीडीआर तपासण्याची मागणी केली आहे. त्यालाही मी सहमत असल्याचेही आ.संदीप क्षीरसागर यांनी म्हटले आहे.
धनंजय मुंडेंना मंत्रिपद गेल्याच दुःख
मस्साजोग प्रकरणात मंत्रिपद गमवावे लागल्याचे धनंजय मुंडेंना दुःख आहे. त्या आकसातून ते आरोप करत आहेत. ज्याप्रकारे ते या प्रकरणात बोलत आहेत त्याचप्रकारे, त्याच आक्रमकतेने त्यांनी स्व.संतोष देशमुख प्रकरणातही बोलायला पाहिजे होते. धनंजय मुंडे हे सत्तापक्षात आहेत. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री हे ना.अजितदादा पवार आहेत ते त्यांचे नेते आहेत त्यांच्यावर त्यांनी विश्वास ठेवला पाहिजे. ना. अजितदादा असला प्रकार अजिबात खपवून घेणार नाहीत. अशी भावनाही आ.क्षीरसागर यांनी व्यक्त केली आहे.