परळी वैद्यनाथ येथे कृषी भवन उभारण्याच्या १ कोटी ६७ लाख रुपयांच्या निधी खर्चास प्रशासकीय मान्यता
धनंजय मुंडे यांची आणखी एक शब्दपूर्ती
मुंबई : माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी मागणी केल्याप्रमाणे सहकार व पणन विभागाने मराठवाड्यात नामांकित असलेल्या परळी वैद्यनाथ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कृषी भवन उभारण्याच्या कामासाठी १ कोटी, ६७ लाख ७० हजार रुपयांच्या निधी खर्चास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजनेतून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. धनंजय मुंडे यांनी यानिमित्ताने परळी मतदारसंघात दिलेल्या आणखी एका शब्दपूर्तीस दुजोरा प्राप्त झाला आहे. परळी वैद्यनाथ कृषी उत्पन्न बाजार समिती ही मराठवाड्यात वैभव संपन्न बाजार समिती म्हणून ओळखली जाते. शिवाय ज्योतिर्लिंग स्थळ असल्याने येथील कृषी उत्पन्न बाजारपेठ मोठी आहे. त्यामुळे येथे विविध कामांसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना निवारा व सर्व सोयी एकत्र उपलब्ध होण्याच्या दृष्टीने येथे शेतकरी भवन उभारण्याच्या कामासाठी निधी मंजूर करण्याची मागणी धनंजय मुंडे यांनी केली होती. त्यानुसार सहकार विभागाने आज प्रशासकीय मान्यता दिली आहे. याबाबत बाजार समितीचे सभापती सूर्यभान मुंडे, उपसभापती श्री जाधव, सचिव बलवीर रामदासी यांनीही आ. धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला. तसेच त्यांनी श्री मुंडे यांच्या सह सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत.