बीडमध्ये महिलांनी काढला कॅन्डल मार्च
अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणी नागरिकांमधून संताप
बीड : शहरात अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळप्रकरणी संतप्त नागरिकांनी सोमवारी (दि.३०) सायंकाळी ७ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात कॅन्डल मार्च काढून निषेध व्यक्त केला. यावेळी सर्वस्तरातील महिला, युवती व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. हातात कॅन्डल्स व मागण्यांचे फलक घेत सहभागी महिलांनी मुलगी आहे, अबला नाही, अत्याचाऱ्यांना माफी नाही; बीड जागं झालं, न्यायासाठी उभं राहिलं; नराधमांनो, चुकीला माफी नाही आणि एसआयटी स्थापन झालीच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणून टाकला. या कॅन्डल मार्चच्या माध्यमातून केवळ नराधम आरोपीच नाही, तर त्यांना पाठीशी घालणाऱ्या लोकप्रतिनिधींचाही निषेध करण्यात आला. ठोस कारवाई न झाल्यास मोठे आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी सर्वस्तरातील महिला, कार्यकर्त्यांसह नागरिकांची उपस्थिती होती. राष्ट्रगीताने कॅण्डल मार्चचा समारोप झाला.
पीडितेला न्याय मिळेपर्यंत संघर्ष चालू राहणार
आरोपींना मदत करणाऱ्या व्यक्तींना सहआरोपी करण्यात यावे. प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करावी. चौकशी महिला आयपीएस अधिकाऱ्यांकडूनच करण्यात यावी. पीडितेला न्याय मिळेपर्यंत संघर्ष चालू ठेवला जाईल, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली.