आरोपी शिक्षक विजय पवारला राजकीय पाठबळ :
डॉ.योगेश क्षीरसागर
विजय पवार हा आमदार संदीप क्षीरसागरांचा राईट हॅन्ड
बीड : नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या १७ वर्षीय विद्यार्थिनीच्या लैंगिक छळ प्रकरणातील आरोपी शिक्षक विजय पवारला राजकीय पाठबळ असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांनी केला आहे. विजय पवार हा आमदार संदीप क्षीरसागरांचा राईट हॅन्ड असून, घटनेनंतर रात्री आमदारांच्या घरी जाऊन संबंधित यंत्रणांना फोन केले गेले. इतक्या गंभीर गुन्ह्यात आरोपी फरार राहतो, यामागे कोणाचा दबाव आहे का, याचा तपास झाला पाहिजे. शिक्षण क्षेत्रात पवार यांचा दबदबा असून, याआड अनेक आर्थिक गैरव्यवहार झाले असल्याचा आरोपही डॉ.क्षीरसागर यांनी केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून पीडितेला न्याय द्यावा. तसेच, सोमवारी बीड जिल्हा बंद पुकारण्यात आला असून सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. विजय पवार हा आमदार संदीप क्षीरसागर यांचा निकटवर्तीय आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर तो लोकप्रतिनिधीच्या घरी गेला आणि त्यानंतर फरार झाला, असे सांगत यंत्रणेवर दबाव टाकला गेला का, याची चौकशी करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले. शिक्षण क्षेत्रात पवारचा दबदबा असून, याआड आर्थिक गैरव्यवहार, जमीन घोटाळे व क्लासेस चालक व विद्यार्थ्यांना त्रास देण्याचे प्रकार घडले आहेत. या घटनेमुळे पालक व विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, बीडमध्ये शनिवारी शैक्षणिक बंद पाळण्यात आला. सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या जिल्हा बंदमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ.क्षीरसागर यांनी केले. पीडित मुलगी मानसिकदृष्ट्या खचली असून, तिच्या कुटुंबीयांनी पुढे येऊन आवाज उठवावा, तसेच हा लढा सर्वांचा व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करून पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी स्वतः पुढाकार घेणार असल्याचे डॉ. योगेश क्षीरसागर यांनी सांगितले.
राजकारण बाजूला ठेवून एकत्र येण्याचे आवाहन…
पोलीस अधीक्षकांकडून तसेच पीडितेच्या कुटुंबियांकडून माहिती घेतली असून, संपूर्ण प्रकरण पालकमंत्र्यांसमोर मांडले जाणार आहे. पवारचे सीडीआर तपासणे, सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेणे आणि आरोपीवर कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याचे डॉ.क्षीरसागर यांनी स्पष्ट केले. राजकारण बाजूला ठेवून आरोपीला वाचवण्याचा कोणताही प्रयत्न होऊ नये, यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.