बीड : खाजगी क्लासेसच्या नावाखाली शहरात सुरू असलेले घाणेरडे प्रकार संताप जनक असून जिल्हाभरात खाजगी क्लासेस मोठ्या प्रमाणात चालत आहेत. या क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांना शिकवण देणारे शिक्षक यांचे चरित्र प्रमाणपत्र तपासणे आवश्यक झाले असून शहरातील उमाकिरण शैक्षणिक संकुल मधील घडलेल्या प्रकारामुळे पालक वर्गात संताप व्यक्त करण्यात येत असून जिल्हाभरात सुरू असलेले खाजगी क्लासेस बंद करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्य महिला उपाध्यक्ष वर्षाताई जगदाळे यांनी केली आहे. गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या उमा किरण येथील खाजगी क्लासेसचे शिक्षकांना तात्काळ अटक करत कडक कारवाई करण्याची मागणी वर्षाताई जगदाळे यांनी केली असून, खाजगी क्लासेस मध्ये शिकवणी घेणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या प्रा. विजय पवार व प्रशांत खटावकर हे दोन्ही आरोपी गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झाले आहेत. या प्रकरणामुळे खाजगी क्लासेस मधील मुलींची सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पालक आपल्या मुलांचे भविष्य घडवण्यासाठी खाजगी शिकवणी मध्ये विद्यार्थ्यांना मोठी फिस भरून दाखला घेतात. या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकवणी देणारे शिक्षक यांची गुणवत्ता व चरित्र तपासणी होणे आवश्यक बनले आहे. बीड जिल्ह्यात मागील काही वर्षात महिला व मुलीवर अत्याचारात वाढ झाली आहे. शिक्षण क्षेत्रातील या घटनेमुळे बीड जिल्ह्याची मान शर्माने पुन्हा खाली गेली आहे. विशेष म्हणजे यातील आरोपी हा सामाजिक व राजकीय प्रतिष्ठित असून त्यांच्याकडून असे गैरकृत्य होणे समाजाला अपेक्षित नाही. परंतु अशा हीन मानसिकतेच्या नराधमाला समाजात राहण्याचा कोणताही अधिकार नाही. अशा विकृत लोकांमुळे समाजात चुकीचा संदेश जातो. हजारो विद्यार्थी एका ठिकाणाहून भविष्य घडवण्यासाठी स्वप्न पाहत आहेत त्याच ठिकाणी असे घाणेरडे प्रकार होत असतील तर पालकांनी काय करावे असा प्रश्न उपस्थित होत असून या दोन्ही आरोपींना पोलिसांनी तात्काळ अटक व खाजगी क्लासेस पूर्णपणे बंद करण्याच्या मागणीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर 1 जुलै 2025 रोजी धरणे आंदोलन करणार असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्य महिला उपाध्यक्ष वर्षाताई जगदाळे यांनी निवेदनात म्हटले आहे.