आ.संदीप क्षीरसागरांची ‘आमदार आपल्या गावी व दारी’ मोहीम नागरिकांसाठी दिलासादायक
पाली, लिंबागणेश, मांजरसुंबा पंचायत समिती गणातील नागरिकांच्या सुटल्या अडचणी
बीड : आ.संदीप क्षीरसागर यांनी ‘आमदार आपल्या गावी व दारी’ ही संकल्पना घेऊन बुधवारी (दि.२५) रोजी बीड तालुक्यातील लिंबागणेश, मांजरसुंबा आणि पाली पंचायत समिती गणांमधील नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी विशेष मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सहभागाने गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करण्यात आल्या.यावेळी सामाजिक कल्याणकारी योजनांचा लाभ थेट गावकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी श्रावण बाळ योजना आणि संजय गांधी निराधार योजनेची मंजूरी पत्रे ग्रामस्थांना वितरित करण्यात आली. या उपक्रमामुळे गावकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यास मदत झाली असून, स्थानिक पातळीवर प्रशासकीय सहकार्य वाढल्याचे दिसून आले. आ.क्षीरसागर यांनी या मोहिमेद्वारे गावकऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. हा उपक्रम ग्रामीण भागातील नागरिकांसाठी दिलासादायक ठरला आहे. या बैठकीस माजी आ.सय्यद सलीम, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्यासह तहसील कार्यालयाचे सर्व अधिकारी, पंचायत समिती, महावितरण, कृषी विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाणीपुरवठा विभाग, लघुपाटबंधारे विभाग आदी प्रशासकीय विभागांचे अधिकारी व चौसाळा जिल्हा परिषद गटातील गावांमधील नागरिक उपस्थित होते.