अजित पवारांच्या मनात नसतानाही भुजबळ मंत्री
झाले!
मुंबई : महायुतीने राज्यात पुन्हा सत्ता स्थापन केली. मात्र महायुतीच्या मंत्रिमंळात राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांना डावलण्यात आलं. त्यामुळे छगन भुजबळ हे नाराज होते. वेळोवेळी त्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली होती. अजित पवार यांच्यावर देखील त्यांनी अनेकदा टीका केली. मात्र भुजबळांच्या नाराजीची पक्षनेतृत्वाकडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही. मंत्रिमंडळात आपल्याला जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याच्या भावनेने भुजबळ अजित पवार यांच्यापासून काहीसे दूरावले होते. त्यांनी पक्ष सोडण्याचा इशाराही दिला. पण अजित पवार यांच्यावर या सगळ्यांचा काहीही परिणाम झाला नाही. मग अचानक असं काय झालं आणि भुजबळ मंत्री झाले? अजित पवारांच्या मनात नसतानाही भुजबळांनी ही किमया कशी केली अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.छगन भुजबळ यांच्या नावाची घोषणा राजभवनातून जरी झाली असली तरी भुजबळांना मंत्रिपद दिलं जाणार यासंदर्भातील माहिती राष्ट्रवादी पक्षाकडून न येता ती भाजप या पक्षातून दिली गेली. त्यामुळे भुजबळांची वर्णी लागणं ही भाजपची इच्छा होती असं स्पष्ट झालं आहे. छगन भुजबळ हे ओबीसी नेते आहेत. भाजपचे राजकारण कायम ओबीसी केंद्रित राहिले आहे. त्यामुळे भुजबळांसारखा ओबीसींचा मोठा चेहरा सोबत असावा अशी भूमिका सुरुवातीपासून भाजपची होती. त्यामुळे भुजबळांनी देखील तीच संधी हेरली व या काळात भाजपसोबत जवळीक साधली.