परळी मारहाणप्रकरणी सात जण ताब्यात
बीड : शिवराज दिवटे शुक्रवारी जलालपूर येथील अखंड हरिनाम सप्ताहातून घरी परतत होता. त्यावेळी परळीतील रिलायन्स पेट्रोल पंपावरुन शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास शिवराज दिवटे याचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर त्याला टोकवाडी गावातील रत्नेश्वर मंदिराच्या परिसरात नेण्यात आले. तेथे टोळक्यांनी शिवराज दिवटे याला बेदम मारहाण केली. संशयित आरोपींचा जवळपास आठ ते दहा – बारा जणांचा गट होता. त्यात शिवराज याला लाठ्या आणि काठ्यांनी बेदम मारहाण केली जात होती. अगदी दंडाचा जोर लावून टोळके त्याला मारत होते. एकजण बेल्टच्या साह्याने प्रहार करत होता. यावेळी शिवराज जमीनीवर आडवा पडलेला होता. तेव्हा अनेकजण मोठ्या म्रगुरीने या असहाय तरुणाला अमानुष मारहाण करत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना असून दहा ते बारा जणांचे टोळके अपहरण करुन आणलेल्या एका तरुणाला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण करत असल्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
परळी मारहाणप्रकरणी सात जण ताब्यात
परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होताच तातडीने पावले उचलत पोलिसांनी तेलगाव येथून चौघांना अटक केले असून इतर तिघांना परळी परिसरातून अटक केले आहे. आतापर्यंत या प्रकरणात सात जणांना अटक करण्यात आले असून उर्वरित आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. याप्रकरणी परळी संभाजीनगर पोलीस ठाण्यात समाधान मुंडे, रोहित मुंडे, आदित्य गीते, ऋषिकेश गिरी, प्रशांत कांबळे, सन्मित्र शिंदे, सौमित्र गोरे, रोहन वगळकर, सुरज मुंडे, स्वराज्य गीते असे दहा आरोपी आणि अनोळखी दहा अशा एकूण वीस जणांवर बीएनएस कलम 109, 126(2), 140(3), 118(1),189(2),189(4),190, 191(3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास संभाजीनगर पोलीस करत आहेत.