केज : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक करण्यात आली होती, तर त्यांना मदत करणाऱ्या आणखी एका आरोपीला देखील अटक करण्यात आली. दरम्यान या आरोपींना पोलिसांकडून केज न्यायालयात हजर करण्यात आलं. कोर्टानं या घटनेतील तीनही आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. कोर्टात युक्तिवाद करताना डीवायएसपी अनिल गुजर यांनी म्हटलं की, सुदर्शन घुले याने हत्येआधी अवादा कंपनीच्या प्रकल्पाच्या ठिकाणी जाऊन दमदाटी केली होती. त्यानंतर त्याला मारहाण झाली होती. संतोष देशमुख आणि मस्साजोग मधील लोकांनी त्याला मारहाण केली होती. त्यानंतर संतोष देशमुख यांना रस्त्यात अडवून एके दिवशी आरोपींनी जबरदस्त मारहाण केली, त्यातच त्यांचा मृत्यू झाला.