मुंबई : जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणार महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींची संपत्ती जप्त करा, असे आदेश मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीआयडीला दिले आहे. बीड जिल्ह्यात ज्या लोकांचे बंदुकींसोबतचे फोटो समोर येत आहेत, त्यांची खातरजमा करून त्यांचा शस्त्र परवाना जप्त करा, असे आदेशही देवेंद्र फडणवीस यांनी बीड पोलिस अधीक्षकांना दिले आहेत. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर तीन आरोपी अद्यापही फरार आहेत. घटनेला जवळपास 19 दिवस उलटले, तरी अद्याप फरार आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले नाही. यामुळे विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. त्यातच आता राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फरार आरोपींची संपत्ती जप्त करा, सीआयडीचे अतिरिक्त महासंचालक बुरडे यांना आदेश दिले आहेत. शिवाय तातडीने फेर आढावा घेण्यासही सांगण्यात आले आहे.