माझ्या राजकीय जीवनाची सुरुवातच नारायणगडाचा आशिर्वाद घेऊन झाली आहे : आ.संदीप क्षीरसागर
नारायणगडावरील विकासकामांचा आ. क्षीरसागरांनी घेतला आढावा
बीड : मी आणि माझे कुटुंब गेल्या तीन पिढ्यांपासून श्री क्षेत्र नारायणगडाचे भक्त आहोत. माझ्या राजकीय आणि सामाजिक जीवनाची सुरुवात ही नारायणगडाचा आशिर्वाद घेऊनच झालेली आहे असे प्रतिपादन आ.संदीप क्षीरसागर यांनी श्री क्षेत्र नारायणगड येथे केले. रविवार (दि.२०) रोजी श्री क्षेत्र नारायणगड येथे सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा घेण्यासाठी आ.संदीप क्षीरसागर गेले होते. रविवारी आ.संदीप क्षीरसागर यांनी श्री क्षेत्र नारायणगड येथे सुरू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी केली आणि आढावा घेतला. आ.क्षीरसागर यांनी यावेळी श्री नगदनारायण महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. तसेच महंत, प्रेममुर्ती ह.भ.प. शिवाजी महाराज यांचे आशिर्वाद घेऊन गडाचे उत्तराधिकारी महंत ह.भ.प.संभाजी महाराज यांचा सत्कार केला. आ. क्षीरसागर यांनी श्री क्षेत्र नारायणगड येथे सुरू असलेल्या सर्व विकास कामांचा आढावा घेतला. तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी यांची महंत शिवाजी महाराज यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. या बैठकीत गडाच्या अनुषंगाने विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच महंत शिवाजी महाराज आणि परिसरातील भाविक यांच्या सुचनेनुसार आवश्यक बाबींची पुर्तता करण्याच्या सूचना आ.संदीप क्षीरसागर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी विविध मान्यवरांसह संबंधित शासकीय विभागांचे अधिकारी आणि पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.