च‑हाटा रेल्वे पुल पाडण्याचे काम सुरू जनतेच्या पैशांचा धुराळा!
दोषींवर कारवाईसाठी रेल्वे सुरक्षा आयुक्तांची टाळाटाळ : डॉ.गणेश ढवळे
बीड : अहिल्यानगर–बीड रेल्वेमार्गावरील च‑हाटा रोडवरील पालवण फाटा येथे पावणे तीन कोटी रुपये खर्चून उभारलेला रेल्वेपुल लोहमार्ग व पुलाची दिशा यांचा अंदाज चुकल्याने निरुपयोगी ठरला असून आता तो पाडण्याचे काम जोमाने सुरू आहे. या प्रक्रियेत जनतेच्या करातून शासनाकडे जमा झालेल्या निधीचा प्रचंड अपव्यय होत असल्याचे निदर्शनास आले आहे. सदर प्रकरणात सखोल चौकशी करून संबंधित अभियंता, ठेकेदार कंपनी यांच्यावर प्रशासकीय कारवाई करून शासन तिजोरीत नुकसानभरपाई जमा करावी, या मागणीसाठी दि.५ फेब्रुवारी रोजीच सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे, शेख युनुस, सुदाम तांदळे, रामनाथ खोड, शिवशर्मा शेलार , शेख मुस्ताक, शेख मुबीन,अशोक येडे,रामधन जमाले यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यावेळी रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांनी “लवकरच कारवाई होईल” असे आश्वासन दिले होते. मात्र साडेपाच महिने उलटूनही कोणतीही कारवाई न झाल्याने, आता पुल पाडण्याचे काम सुरू असून, सामाजिक कार्यकर्त्यांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा रेल्वे प्रशासनाला दिला आहे.
—
खा. बजरंग सोनावणे व आ. संदीप क्षीरसागर गप्प
दि.५ फेब्रुवारी रोजी खा.बजरंग सोनावणे व आ.संदीप क्षीरसागर यांनी पालवण फाटा पुलाची प्रत्यक्ष पाहणी करून आंदोलनकर्त्यांची भेट घेतली होती. त्यांनी रेल्वे सुरक्षा आयुक्तांशी चर्चा करून कारवाईसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आजवर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने, “या विषयावर लोकप्रतिनिधींनी मुग गिळून गप्पच राहणे निंदनीय आहे,” अशी प्रतिक्रिया डॉ.गणेश ढवळे यांनी दिली.