यावर्षी वाढदिवस सोहळा साजरा करणार नाही : धनंजय मुंडे
सहकारी – कार्यकर्त्यांनी बॅनर, जाहिराती ऐवजी सामाजिक उपक्रम राबविण्याचे आवाहन
१५ जुलै रोजी भेटीसाठी उपलब्ध नसणार – मुंडेंच्या कार्यालयाकडून माहिती
परळी वैद्यनाथ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांचा येत्या 15 जुलै रोजी वाढदिवस असून, यावर्षी आपण वाढदिवस साजरा करणार नसून सहकारी व कार्यकर्त्यांनी वाढदिवसाचे सोहळे आयोजित करू नयेत, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले आहे. धनंजय मुंडे यांचा वाढदिवस हा दरवर्षी चाहते व कार्यकर्त्यांसाठी मोठी पर्वणीच असतो, मात्र यावर्षी मराठवाड्यात बहुतांश भागात पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आहे, दुसरीकडे नुकतेच जवळचे सहकारी स्व. आर. टी. देशमुख यांचे झालेले निधन आदी बाबींचा विचार करून धनंजय मुंडे यांनी वाढदिवस साजरा करणार नसून, सहकारी – कार्यकर्त्यांनी बॅनर बाजी, जाहिराती आदिंवरील खर्च टाळून त्याऐवजी सामाजिक उपक्रम राबवावेत, असे आवाहन केले आहे. धनंजय मुंडे यांना काही दिवसांपूर्वी बेल्स पाल्सी या आजाराचे निदान झाले होते. त्यानंतर विविध उपचार घेऊन मुंडेंनी इगतपुरी येथील ध्यान केंद्रात विपश्यना देखील केली. आ. धनंजय मुंडे हे येत्या १५ जुलै रोजी ध्यानसाधना करणार असून, ते वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा स्वीकारण्यास परळी वैद्यनाथ किंवा मुंबई वा अन्य कुठेही उपलब्ध असणार नाहीत, असे त्यांच्या कार्यालयाच्या वतीने कळवण्यात आले आहे.