माजलगाव : नगरोत्थान योजनेच्या कामाचे दोन कोटी रुपयांचे बील काढल्याच्या बदल्यात बारा लाख रुपयांच्या लाचेची मागणी करत सहा लाख रुपये स्विकारतांना माजलगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण याला रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई गुरुवारी सायंकाळी चव्हाण याच्या घरी करण्यात आली माजलगाव शहरामध्ये नगरोत्थान योजने अंतर्गत विकासकामे सुरु आहेत. तक्रारदार कंत्राटदाराने माजलगावमध्ये केलेल्या सिमेंट रस्त्याचे दोन कोटी रुपयांचे बील काढण्यासाठी सहा लाख तसेच उर्वरित कामातील रस्त्याच्या बाजुचे अतिक्रमण काढून अडथळे दूर करुन देण्यासाठी सहा लाख अशा बारा लाख रुपयांच्या लाचेची मागणी मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण याने केली होती. याबाबतची तक्रार संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. त्यानुसार गुरुवारी तक्रारदार व पंच यांच्या समक्ष चंद्रकांत चव्हाण याने बारा लाख रुपये लाचेची मागणी केली. यातील सहा लाख रुपये गुरुवारी व उर्वरित सहा लाख शुक्रवारी (दि.11) रोजी देण्याचे ठरले होते. त्यानुसार चंद्रकांत चव्हाण याच्या माजलगाव शहरातील पिताजी नगरी भागातील घरी तक्रारदार सहा लाख रुपये घेवून गेले, त्यावेळी चव्हाण याने हे सहा लाख रुपये स्विकारताच त्याला लाचेच्या रकमेसह पकडण्यात आले. चव्हाण याने सहा लाख रुपये लाच घेताना कारवाई करण्यात आल्यानंतर त्याच्या माजलगाव येथील तसेच जामखेड येथील घरावरही छापा टाकत तपासणी करण्यात येत आहे. यामध्येही मोठे घबाड हाती लागण्याची शक्यता व्यक्त केली जात असून ही कारवाई पूर्ण झाल्यानंतरच यामध्ये काय काय हाती लागले, हे समोर येऊ शकणार आहे. ही कारवाई पोलिस अधिक्षक माधुरी केदार-कांगणे , प्रभारी अपर पोलिस अधिक्षक सुरेश नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार अशोक नागरगोजे, राजेंद्र सिनकर यांनी केली.
सहा लाखाची लाच घेतांना माजलगावचा मुख्याधिकारी एसीबीच्या ताब्यात

