कुठलाच पात्र लाभार्थी घरकुल सर्व्हेपासून वंचित राहू नये : आ.संदीप क्षीरसागर
सर्व ग्रामसेवकांनी खबरदारी घेण्याच्या कडक सूचना
बीड : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या सेल्फ सर्व्हे ला ३१ मे २०२५ पर्यंत मुदतवाढ मिळालेली आहे. परंतु ग्रामीण भागातील अनेक लाभार्थ्यांकडे स्मार्टफोन नसल्यामुळे सेल्फ सर्व्हे करण्यासाठी अडचण येत आहे. त्यामुळे कुठलाही लाभार्थी सर्व्हेपासून वंचित राहू नये यासाठी प्रशासनाने सर्व ग्रामसेवकांना कडक सूचना द्याव्यात, असे निर्देश आ.संदीप क्षीरसागर यांनी प्रशासनाला दिले आहेत. ग्रामीण भागातील पात्र नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मोबाइलद्वारे सेल्फ सर्व्हे करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. तांत्रिक अडचणींमुळे आणि विलंबामुळे कोणताही पात्र लाभार्थी या योजनेपासून वंचित राहू नये याकरिता सेल्फ सर्व्हे करण्यासाठी प्रशासनाकडून मुदतवाढही देण्यात आली आहे. परंतु ग्रामीण भागातील अनेक पात्र लाभार्थी हे अशिक्षित आहेत तसेच अनेकांकडे स्मार्टफोन नाहीत, आणि अनेकांना तांत्रिक माहिती नसल्यामुळे सेल्फ सर्व्हे करण्यासाठी अडचणी येत आहेत. या बाबींचा विचार करून गावपातळीवर, ज्या पात्र लाभार्थींना सेल्फ सर्व्हेबाबत अडचणी आहेत त्या लाभार्थींचा सर्व्हे ग्रामसेवकांनी करून द्यावा. एकही पात्र लाभार्थी सेल्फ सर्व्हेपासून वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे कडक निर्देश ग्रामसेवकांना द्यावेत. अशा सूचना आ.संदीप क्षीरसागर यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक, गटविकास अधिकारी बीड व शिरूर (का.) यांना दिल्या आहेत.