केज : भरधाव वेगात निघालेल्या एका कंटेनरने आठ ते दहा वाहनाना धडक देऊन चिरडल्याची व यात एक महिला ठार तर 20 ते 25 जण जखमी झाल्याची दुर्देवी घटना आज दुपारी केज मध्ये घडली असून घटनास्थळाहून फरार झालेला कंटेनर पुढे लोखंडी सावरगाव नजिक पलटी झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की केजहून अंबाजोगाईकडे येत असताना कंटेनरने लोखंडी सावरगावजवळ इतर गाड्यांना धडक दिल्याने अपघात घडला, त्यात 8 ते 10 गाड्यांना धडक देण्यात आली. कंटेनरचा चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. या अपघातत एका महिलेचा मृत्यू झाला असून 20 ते 25 जण जखमी असल्याची माहिती आहे. अपघातातील जखमींवर केज व अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गाड्यांना धडक दिल्यानंतर पुढे अंबाजोगाईजवळील लोखंडी सावरगाव जवळ हा कंटेनर पलटी झाला आहे. अपघाताच्या घटनेनं जमाव संतप्त झाला होता. त्यामुळे, कंटेनर पलटी झाल्यानंतर लोखंडी सावरगावजवळ संतप्त जमावाने कंटेनर पेटवला दरम्यान, कंटेनर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.